Monday, June 15, 2020

शब्दावाचून कळले सारे

पाहिलं प्रेम हे फुलपाखरा सारखं असतं. ते स्वइचछेने आपल्या जवळ येतं आणि आपण जवळ गेलो कि भुर्र्कन उडून जातं. त्यातील मज्जाच निराळी असते. काही वेळ भोवती उडून आयुष्यभरासाठी त्याची आठवण देऊन जातं.

हि गोष्ट आहे मकु आणि मयुची, माझ्या पहिल्या प्रेमाची. या गोष्टीतला मी, मकु आणि ती, मयु. सुरुवात एका चित्रपटा सारखीच झाली होती. एकदा तिची मैत्रिणीचं माझ्या मित्राशी बोलणं झालं. त्या नंतर हि बातमी माझ्या मित्रांना कळली, मग माझ्या पर्यंत पोचली. अमुक-अमुक मुलगी मला पसंत करते. मी तेव्हा ११वीत होतो. आपल्याला कोणी तरी line देतंय म्हणून गंमत वाटली. पण मित्रांमध्ये फजिती झाली म्हणून राग पण आला. त्याच दिवशी तिला जाऊन सुनावलं आणि आमचा वाद तिथून सुरु झाला. एक-मेका समोर आलो कि खुन्नस दाखवणं रोजचं झालं होतं. पण हे दिवस जास्त काळ टिकले नाही. 

माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी होती. १२वीत मी शहरात आलो. ११विचं पूर्ण वर्ष आम्ही राग दाखवण्यात घालवला होता. जाता-जाता, सर्व मिटवून जावं. मी तिला sorry म्हणायला गेलो आणि तिची friendship घेऊन आलो. असं का करावं कुणाच ठाऊक पण काही अर्ध सोडून येणं मला पटत नव्हतं. मयुचं पर्व इथेच संपवलं असं समझून मी त्या दिवशी निघालो. वेळ गेली तसं समझलं मयुचं पर्व तर आता सुरु झालंय. 

आम्ही रोज सारखे एक-मेकांना पाहू शकत नव्हतो. दूर राहत होतो पण अंतर कमी होत होतं. अधी एक-मेकांचं तोंड पाहत नव्हतो पण आता एका call च्या हाकेवर आम्ही बोलू लागलो होतो. माझ्या वाढदिवसाला तिनं पहिल्यांदा माला call केला होता. त्या काळी, mobileची सुविधा नव्हती. घरातल्या landline वर ती coinbox वरून call करायची. २ ते ३ नाण्यांचं budget असायचं. त्यात जमेल तितकं बोलायचो आणि उरलेलं पुढच्या वेळीसाठी राखीव असायचं.

महिन्यात एकदा गावी फेरी असायची. तेव्हाच आमची भेट होयची. गावा बाहेर एक नदी होती. तिच्या काठाशी आम्ही बसायचो आणि मनसोक्त बोलायचो. घरी आल्यावर पुन्हा भेटण्याची ओढ असायची. असं कधी कोण बद्धल वाटलं नव्हतं. दर महिन्याची गावची फेरी हवी-हवीशी वाटू लागली होती. एकदा कामा निमित्त आमचं गावी जाणं cancel झालं. मी जाण्याचं खूप हट्ट केला, पण काही उपयोग झाला नाही. काही करून तिला भेटायचं होतं. महिना भर वाट पाहिल्यावर तिला पाहणार होतो. काही करून माझं गावी जाणं निश्चित होतं. 

त्या काळी दिवसाला १ train गावी जायची. तिकिटाचे पैसे जमा करून station ला पोहोचे पर्यंत माझी ती train चुकली. जाणं तर ठरलं होतं. मागून एक माल-गाडी येत होती. मला त्या गाडीत चढायचं होतं. मी तिच्या गतीचा अंदाज घेतला. त्याचे डब्बे एक-एक करत पुढे सरकत होते आणि डब्ब्यांचं वेग कमी होत होता. मी कसलाच विचार न करता, guard च्या डब्ब्यात उडी मारली. माझा आनंद आभाळी पोचलं होता आणि तसंच जमिनीवर आला. दुष्काळात १३ वा महिना म्हणावं, गावाचं स्टेशन मागे राहिलं आणि गाडी yard त जाऊन थांबली. पण तिला भेटण्या करीत मी २ किलोमीटर चालून platform पर्यंत आलो. 

खूप थकलो होतो. पाय दुखत होते. तिला समोर पाहिलं आणि अचानक छान वाटू लागलं. थकवा जाणवत नव्हता. तिच्यासोबत १ तास घालवायला सर्व अट्टाहास.  ती, मी आणि नदीचं काठ... राधा-कृष्णा सारखी feeling येत होती. असं पहिल्यांदा जाणवलं होतं. काही काळ हे असंच घडत होतं. आम्ही गुपचूप भेटायचो.  वेगळीच भावना होती. वेगळंच जग होतं आमचं. 

एक दिवशी ती भेटायला आली आणि तिच्या साठी आलेल्या स्थळा बद्धल सांगितलं. तिच्या घरी सर्वांना मुलगा आवडला होता. मी काहीच बोललो नाही. त्या दिवशी ती भेटण्याची गंमत हरवली होती. मला काय म्हणायचं ते उमजत नव्हतं. अंधार होऊ लागला होता. मी घरी परतलो. काहि दिवस गेले तिचा call आला नाही. मग महिना गेला पण call आला नाही. गावी गेलो आणि मी नदी काठी तिची वाट पाहत होतो. पण ती आली नाही. असं काही महिने गेले. सुरवातीला मला काही सुचत नव्हतं पण समझलं आता ती येणार नाही. 

बरेच महिने गावी गेलो नव्हतो. परीक्षे नंतर गावी जावं असं वाटलं. मयुचा जुना मित्र म्हणून तिच्या घरी गेलो. तिच्या आईशी बोलणं झालं. गेल्या महिन्यात तिचं लग्न झाल्याचं कळलं. त्यावर मी हसून पेढा तोंडात कोंबला. मला तिथून निघायचं होतं. थोड्या वेळाने मी बाहेर पडलो. मला रडू येत होतं पण मी रडलो नाही. मी घरी आलो. शांत पडून राहिलो. येत्या दिवसांमध्ये तिचा विसर पाडत होतो. पण कधी phone दिसला कि तिचा विचार यायचा. गावी गेलो कि ती आठवायची.

बरेच प्रयत्न केले पण एकदा तिला पाहायची ओढ होती. त्या दिवशी तिला काही बोललो नाही त्याची भरपाई कदाचित. पण शेवटचं तिला पाहायचं होतं. दुसऱ्या दिवशी मी तिच्या गावी निघालो. गावात विचारत-विचारत तिच्या घरासमोर पोचलो. दारा पलीकडे ती असेल याचा विचार करून मी तिथेच उभा राहिलो. दार वाजवलं  नाही. माझी हिम्मत झाली नाही आणि मी वळलो. इतक्यात दार उघडलं आणि समोर ती उभी होती. पण ती माझी 'मयु' नव्हती. कपाळी कुंकू, हाती हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र. ती कोणाची तरी 'माया' होती. काही वेळ मी तिला पाहत तिथेच उभा राहिलो. भिजलेल्या पापण्यांतून आम्ही एक-मेकांना पाहत होतो. काही न बोलता मी तिथून निघालो. 

ती आमची शेवटची भेट. म्हणतात पाहिलं प्रेम अपुरं राहतं. मकु आणि मयुचं पर्व या टप्प्यावर संपलं होतं. आमचं प्रेम कधी शब्दात व्यक्त केलं नव्हतं. ते फक्त अनुभवलं होतं. असा अनुभाव जो आयुष्यभर पुन्हा जाणवणार नाही. पाहिलं प्रेम परत होत नाही तसेच माकुची मयु पुन्हा दिसणार नाही.

---परिणिता (१४/०६/२०२०)