Wednesday, March 14, 2012

सांज पिशी


सूर्य मावळतीला होता. समोर पसरलेल्या डोंगरमालांत नागमोडी  रस्त्यावर गाड्या धावत होत्या. त्यातील एक डोंगराच्या कडेवर बसणे आणि सांज पाहणे हे मला नेहमीच आवडतं. होय... ही जागा म्हणजेच लोणावळ्यातील tiger hills चा sunset point. रस्त्याच्या कडेला उंच कट्टे बांधले आहेत. त्या कट्ट्यांवर बसून पाय मोकळे सोडायचे आणि त्या थंड वारयात गरम-गरम मका खायचा. अशीच एक संध्याकाळ, पण काही वेगळी.  अशीच एक संध्याकाळ पण एका वेगळ्या व्यक्ती सोबत.

आजवर sunset point ला मित्र-मैत्रिणी सोबत अनेक वेळा जाउन आलेला, college च्या गप्पा आणि गोड-आंबट भांडणात वेळ घालवलेला. पण आता college संपले आणि व्यवसायाची वाट धरली. आयुष्यात थोडे serious व्हावे म्हणून चार पैसे कमवून घराची जबाबदारी घेतली. आणि मग तो क्षण आला जेव्हा कुणासाठी तरी जगावसं वाटलं. त्या व्यक्तिला पाहताच जणू मनात एका सेकंदात हजार तारा वाजतात. सामान्य वातावरणात ही अंगावर शहारं फुटतं. आणि boss समोर नसताना ही हृदयाचा ठोका वाढतो. अश्या व्यक्तीला पाहणं हे नजरेला किती सुखावतं हे शब्दांत तर सांगूच शकत नाही.

अशीच एक व्यक्ति, माझ्या सोबत sunset point ला आहे म्हणाल्यावर, माझ्या मनाची काय दशा असावी हे मला नव्याने सांगायची गरज भासत नाही.

आम्ही दोघे bike बाजूला लावून , sunset point ला मावळता सूर्य पाहत होतो आणि त्या सोबत लागलेल्या जुन्या आठवणींच्या सरी. खरं तर ती माझी जुनी मैत्रीण, पण तेव्हा असं काहीच नव्हतं. आयुष्यात mature होता-होता, तिच्यासाठी माझ्या भावना ही mature होऊ लागल्या.

त्या संध्याकाळी कळत नव्हतं की संध्याकाळ जास्त सुंदर आहे की ती? किंवा तिच्या असण्याने संध्याकाळ जास्त सुंदर झाली आहे?

तिच्या कडे पाहताना प्रत्येक वेळी हृदयाचे ठोका चुकत असे.  संध्याकाळच्या त्या लाल-तांबड्या प्रकाशात तिचं रूप काही वेगळंच झळकत होता. तिच्या गव्हाळ कांती वर पडणारं ते लाल - तांबडे उन्ह सोनेरी भासत होतं. तिच्या पासून अंतरावर बसलो होतो पण जेव्हा ती माझ्या कडे पाहत होती, तिचे नितळ डोळे, दवाच्या थेंबा परि वाटत होते. बोलता-बोलता सहज तिचा हात केस सावरायचा आणि मग तिचे केस वाऱ्यावर पुन्हा बागडत. माझ्याशी बोलताना तिच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव आणि प्रत्येक क्षणाला शब्दांच्या तालावर नाचणाऱ्या भुवया... माझे तर श्वास निघत नव्हते.

चांगले चाललं होतं... वाऱ्यावर उडणारे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. कुणास ठाऊक कसा पण माझा हात चटकन तिची बट सावरायला उठला. तिच्या कपाळाच्या कोपर्यातन बोटं फिरवत, ते केस तिच्या काना माघे अडकवताना, माझा हात तिच्या चेहऱ्याचा अर्ध वर्तुळ  प्रवास करून आला. खरं तर, तिच्या चेहऱ्या वरून हात उचलावेनसं झालं होतं. मोजुन दहा सेकंद लागली असतील, पण असं वाटले  जणु दुनिया एका चित्रपटाच्या scene सारखी slow motion मध्ये गेली आहे. त्या तेवढ्या वेळात आमची नजर भिडली आणि माझ्या हाताचा स्पर्श होताच तिच्या पापण्या झुकल्या. तिच्याही श्वासाची गति वाढत होती. आणि पटकन तिने nervousness मध्ये तिचे ओठ ओले केले. मनात आलंच होतं कि त्यांना एकदा स्पर्श करावं... हात हनुवटी पर्यंत पोचताना तिने माझ्या कडे पहिले. पण आता तीर कमानीतून सुटला होता. हात उचलताना माझा अंगठा सहज तिच्या ओल्या ओठांवर फिरला. असे काही घडल्यावर एक फटका अपेक्षित होता. पण तसं काही घडलं नाही. ती चक्क माझ्या कडे पाहून हसू लागली. मी पण हसत होतो.

पुढे काही बोलण्याची गरज नव्हती. आमच्या मधलं helmet उचलून मी दुसऱ्या बाजूला ठेवलं व तिच्या सोबत कट्ट्यावर बसलो. बोलण्यासाठी खूप काही होतं पण बोलावसं वाटत नव्हतं. मी तिचा हात माझ्या हातात  धरून ठेवला. सूर्य आता क्षितिजा वर पोचला होता. तिने अलगत तिचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवला.

हळू-हळू अंधार पसरू लागला. त्या संध्याकाळी पुष्कळ काही बोललो नाही पण मनांचा संवाद भरभरून झाला. अशी होती ती संध्याकाळ... थोडी वेडी.... थोडी पिशी... सांज पिशी...



---परिणीता (१४/३/२०१२)

No comments:

Post a Comment