"तुला वेळेवर येण्याचं महत्व कधी कळणार? किती वेळ मी एकटी बसून राहायचं? सगळे विचारत असतात. काय उत्तर द्यायचं त्यांना.... " ती फारच चिडली होती. तिची बडबड इतक्यात थांबण्या सारखी नव्हती. माफी मागितलती तर नवीन काही तरी निघेल म्हणून मी शांत बसून होतो. तिचं आपलं चालू होतं. काही क्षण मी डोळे मिटून ध्यानस्त झालो. काही काळाने बडबड बंद झाली पण धूस-फूस होती. मी गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पडलो.
छान वारा लागत होता. आज manager ने निघू नाही दिलं म्हणून उशीर झाला असं खरं सांगितलं तर जास्त चिडेल कारण काल मी manager चं कारण देऊन चहा घेत बसलो होतो. आज अडकलो ना नेमका. देव पण परीक्षा घेतो. मी गाडीला एक वळसा मारला आणि bonet पाशी येऊन उभा राहिलो. चेहरा ताठ करून गाडी मागे काही तरी बघतोय असं दर्शवत तिच्या रागाचा अंदाज घेत होतो. बडबड शांत झाली होती पण तापमान आहे कि नाही याची परीक्षा कोण घेणार?
मी तिच्या बाजूचं दार उघडलं, वाकून चेहरा तिच्या चेहर्या समोर नेला आणि प्रेमाने म्हणालो, "बाहेर ये ना..." तिनं तोंड फिरवलं. मी ताट झालो आणि मागच्या seat वर जाऊन बसलो. शांततेत माझ्या मनातलं गाणं गुणगुणु लागलो. तिला लाडी - गोडी लावत होतो पण तिच्यावर काही परिणाम होत नव्हतं, पण...
"तुम सोचोगी क्यों इतना, मैं तुमसे प्यार करू,
तुम समझोगी दीवाना, मै भी इकरार करू.... "
ह्या ओळी म्हणताच तिनं वळून पहिलं. राग पूर्णपणे गेला हे नक्की पण आता दाखवतेय तो खोटा राग. माझे खांदे ताठ केले आणि परत तिच्या समोर जाऊन तिला विचारलं, "बाहेर ये ना.."
"नाही" राग नव्हता पण स्वर अजूनही तिखट होते. मी एका ढोपरावर बसलो आणि Romeo सारखं तिचा हात मागत म्हणालो, "ये ना .... "
"हे काय करतोयस? उठ. सगळे पाहत आहेत." ती तिथेच बसून होती.
मी कमरेवर हात ठेवले आणि उभा राहिलो. "बाहेर येणार कि मी उचलून घेऊ?"
"नाही... "आणि ती तोंड फिरवेल इतक्यात मी तिला अलगद उचलून घेतलं. चटकन तिचा एक हात माझ्या माने भोवती होता आणि दुसऱ्या हाताने तिनं चेहरा लपवला होता.
"सोड ना... " ती लाजत म्हणाली. आता माझी पाळी होती त्रास देण्याची.
"म्म्म-हम्म"
"असं काय करतोस... सोड ना..."
"सोडू का... "आणि मी हाताला झटका दिला. तिनं घाबरून दोन्ही हात माझ्या भोवती गच्च धरले आणि माझ्या मिठीत एका teddy bear सारखी बसली. "एका अटीवर.... " मी माझा गाल पुढे केला.
"नाही मिळणार. आज परत तू उशिरा आलास"
परत मी हाताला झटका दिला आणि तिनं माझा shirt गच्च पकडला. मी हळूच माझा गाल तिच्या ओठांवर लावला आणि तिला खाली उभ केलं. तिनं लगेच मला मिठी मारावी हे अपेक्षित नव्हतं. मी हि तिला मिठी मारली. तिचं डोकं मध्य छातीवर येईल इतकीच उंच होती ती.
"I love you, पिल्लू", मी तिच्या केसांना kiss केलं.
"I love you too... "
एक kiss झाली कि राग विसरायचं हि आमची अट होती. आता राग संपला होता. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिनं माझ्या कमरेवर. अंधार होऊ लागला होता. थोड्याच वेळात तिचा जाण्याचा हट्ट सुरु होईल आणि माझे तिला अडवण्याचे प्रयत्न. आभाळात लुकलुकणारे चांदणे दिसू लागले. त्या टेकडीवरून पळत असलेल्या गाड्या आणि जगमगतं शहर दिसत होतं.
"उशीर होतोय. निघायचं का?" ति वळत होती, "अरे! आज चंद्र पाहिलं का? सुंदर दिसतोय. बघ ना"
"हो... खूप सुंदर आहे... पण इकडे." मी तिचा चेहरा माझ्या हातात घेतला. "माझा चंद्र त्याहून सुंदर आहे."
ती लाजली, "तुझं आपलं काहीतरीच असतं. चल आता."
"will you dance with me?" आणि मग ते 'no music' चा इशारा तिनं केला. "ऐक... नीट ऐक... " मी तिचा हात हातात घेतला आणि waltz style मध्ये डोलू लागलो. त्या शांततेत आम्ही एका-मेकात गुंतलो होतो. चांदण्यात तीच दिसत होती आणि मनात एक गाणं सुचलं.
"तुझ्यासाठी एक गाणं म्हणू?"
"कोणतं?"
मी सुरु झालो, "तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी, एकांती माज समीप तीच तू हि कामिनी. तीच तू हि कामिनी.."
"म्हणजे?"
"म्हणजे, चंद्राच्या चांदणी सारखी तूच माझी कामिनी आहेस... " आम्ही काही वेळ तसेच हातात हात घेऊन झुलत होतो. उशीर होत होता पण जाण्याचा हट्ट सुटला होता. माझ्या चंद्राला मिठीत धरून मी त्या आभाळातल्या चंद्राला चिडवत होतो जणू. कदाचित म्हणून त्याचं चांदणं अजून खुललं होतं आणि त्या चांदण्या आम्हावर लुकलुकत हसत होत्या.
----परिणीता (०८/०९/२०२०)